रश्मी ठाकरे सामनाच्या संपादकपदी ; आदित्य ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:41 IST2020-03-01T15:28:15+5:302020-03-01T15:41:39+5:30
रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात प्रतिक्रीया दिली.

रश्मी ठाकरे सामनाच्या संपादकपदी ; आदित्य ठाकरे म्हणाले...
पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामानाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम पाहत आहेत. सामना नेहमीच आपल्या अग्रलेखांसाठी प्रसिद्ध आहे. आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्याने त्या सामनामध्ये काय बदल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज सकाळी रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पुण्यात आयाेजित एशिया इकनाॅमिक डायलाॅग या काॅन्फरन्सला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. काॅन्फरन्सनंतर आदित्य ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची संपादकपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले, सामनाच्या संपादकपदी आईची निवड झाल्याने आनंद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. ही एक मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वजण त्यांच्यासाेबत आहाेत.
दरम्यान उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक हाेते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ते या जबाबदारीतून मुक्त झाले हाेते. संपादक पद हे लाभाचे पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी हाेत्या. सामानाच्या क्रेडिट लाईनमध्ये रश्मी ठाकरे यांचे नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेले काही महिने हे पद रिक्त हाेते. संजय राऊत संपूर्ण जबाबदारी संभाळत हाेते.