रश्मी ठाकरे मैदानात; संजय राऊतांच्या घरी भेट, शिवसेनेच्या बॅनरवरही झळकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 09:03 AM2022-09-30T09:03:06+5:302022-09-30T09:04:57+5:30
रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथे हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
ठाणे - शिवसेना सध्या अंतर्गत कलहाच्या मोठ्या संकटातून जात असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे दिसून आले होते. तर, रश्मी ठाकरेही आवर्जून अनेक ठिकाणी हजेरी लावत आहेत. गुरुवारी त्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्री उत्सवात सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींची भेटही घेतली. त्यामुळे, रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत.
रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथे हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ठाण्यासह, मुंबई व इतर ठिकाणच्या महिला आघाडीने टेंभीनाक्यावर हजेरी लावून शक्ती प्रदर्शन करीत, उध्दव ठाकरे तुम संघर्ष करो, उध्दव ठाकरे आगे बडो, शिवसेना जिंदाबाद अशी घोषणाबाजी देवीच्या मंडपातच केल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर, रश्मी ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीची भेट घेतली. संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात असून पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. आता, रश्मी ठाकरे या खासदार संजय राऊतांच्या मुलुंड येथील निवासस्थानी भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी गप्पाही मारल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोरेगावातील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
कलानगर येथील कमानीवर झळकल्या
रश्मी ठाकरे यापूर्वी कधीही दसरा मेळाव्याच्या बॅनरवर दिसून आल्या नाहीत. मात्र, आता शिवसेनेचा संघर्षाचा काळ असून रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहेत. कलानगर येथील कमानीवर लावण्यात आलेल्या बॅनरवर स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह आता रश्मी ठाकरेंचाही फोटो दिसून येत आहे. त्यामुळे, संघर्षांच्या काळात आता रश्मी ठाकरेंही लढाईत सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे.