Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:34 AM2023-04-13T11:34:54+5:302023-04-13T11:36:38+5:30
Rashmi Thackeray: ठाकरे गट अस्तित्त्वाची लढाई लढत असून, ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य आता राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे.
Rashmi Thackeray: शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भरच पडली. यातच शिंदे गटाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी आता आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
सध्या अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या शिवसेनेसाठी आता ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे शिवसैनिकांनाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
नाशिकमध्ये रश्मी ठाकरे मेळावे घेणार
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर ठाकरेंना सोडून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. नाशिकमध्ये महिलांची मोठी फळी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला होता. थेट संजय राऊत यांनाच एकप्रकारे धक्का मानला जात आहे. हीच महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी आणि विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नाशिकमध्ये रश्मी ठाकरे स्वतः मेळावे घेणार आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे मैदान गाजवणार आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे या नाशिक शहरात महिला मेळावा घेणार आहे. तत्पूर्वी, रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. वरळी तसेच शिवडीमधील कार्यक्रमांना रश्मी ठाकरे हजर होत्या. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र त्यांनी कधीच राजकीय विषयांवर टिप्पणी केली नाही. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी व पदाधिकार्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"