राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो; बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:45 PM2019-01-21T13:45:45+5:302019-01-21T13:46:31+5:30
फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना परवानगी नाकारल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आपले भाषण सुरु केले.
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना परवानगी नाकारल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आपले भाषण सुरु केले. यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले.
नागरिकाला हव्या त्या गोष्टी करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. अशावेळी भाषणे करायला परवानगी रद्द करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात. आयबीचा अधिकारी हा संघाच्या प्रमुखचा भाऊ असतो. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो, असा आरोपही त्यांनी केला.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने परवानगी नाकारण्याचे काय कारण ? हे महाविद्यालय टिळकांनी काढले असून त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती. याच टिळक आणि त्यांच्या शिष्यांनी कट करून छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गात बॉम्ब टाकला होता. तरी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली. शिरोळेंनी महाविद्यालयासाठी जमीन दिली. त्या फर्ग्युसन महाविद्यालयात भाषण न करू देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी आहे, असा आरोप कोळसे पाटील यांनी केला.