रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:13 AM2023-08-21T07:13:15+5:302023-08-21T07:13:37+5:30
उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कारांचे प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योगसमूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.
उद्योग विभागाच्या वतीने देण्यात येणारे ‘उद्योगरत्न’, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार रविवारी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉल येथे प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्या वतीने टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला. उद्योगमित्र पुरस्कार आदर पूनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
रतन टाटा म्हणजे माणसांतील देवमाणूस : मुख्यमंत्री
आपण कुणीही देव पाहिलेला नाही; पण, देव चराचरांत आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसांतील देवमाणसाची निवड केली आहे. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची खात्री आणि प्रचंड सामाजिक भान, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाबाबत दूरदृष्टी असणारे राज्य म्हणूनही ओळखले जाते.
सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची कंपनी आहे. कोविडकाळात ९० टक्के लस ही महाराष्ट्राने पुरविली. महाराष्ट्राची कार्यसंस्कृती वेगळी आहे; त्यामुळे आपण महाराष्ट्रातच यापुढेही उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार हा राज्य, देश सिरम इन्स्टिट्यूटमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार असल्याचे सिरम इन्टिट्यूटचे आदर पूनावाला म्हणाले.