रतन टाटा सरसंघचालकांच्या भेटीला

By admin | Published: December 28, 2016 03:56 PM2016-12-28T15:56:03+5:302016-12-28T18:33:34+5:30

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

Ratan Tata's meeting with Sarsanghchalak | रतन टाटा सरसंघचालकांच्या भेटीला

रतन टाटा सरसंघचालकांच्या भेटीला

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 28 - टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा स्थितीत टाटांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. 

बुधवारी दुपारी रतन टाटा अचानक नागपुरात दाखल झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर ते थेट रेशीमबाग येथील संघ स्मृतिमंदिर परिसरात गेले. तेथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. काही वेळ त्यांनी स्मृतिमंदिर परिसराची पाहणी केली व संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले. त्यानंतर 3 वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात दाखल झाले.
 
संघ मुख्यालयात त्यांनी डॉ. भागवत यांच्याशी सुमारे 20 मिनिटे बंदद्वार चर्चा केली. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, टाटा समूहातील विवादासंदर्भात यात चर्चा झाली का याबाबत त्यांनी मौन राखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. 
 
सरसंघचालकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
रतन टाटा यांचा बुधवारी ७९ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांचा हा दौरा आणखी विशेष झाला. सरसंघचालकांनी यावेळी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. 

ही औपचारिक भेट : संघ
यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ही भेट औपचारिक व पूर्वनियोजित होती, असे त्यांनी सांगितले. या भेटीचा राजकारण व उद्योगाशी काहीही संबंध नव्हता. रतन टाटा यांची अनेक दिवसांपासून संघस्थानाला भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार ते येथे आले, असे गोपनीयतेच्या अटीवर संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Ratan Tata's meeting with Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.