रतन टाटा संघ दरबारी!
By admin | Published: December 29, 2016 03:56 AM2016-12-29T03:56:57+5:302016-12-29T03:56:57+5:30
टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा
नागपूर : टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा स्थितीत टाटांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
बुधवारी दुपारी रतन टाटा नागपुरात दाखल झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर, ते थेट रेशीमबाग येथील संघ स्मृतिमंदिर परिसरात गेले. तेथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. काही वेळ त्यांनी स्मृतिमंदिर परिसराची पाहणी केली व संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले. त्यानंतर, ३ वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात दाखल झाले.
टाटांची ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, टाटा समूहातील विवादासंदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाली का, याबाबत त्यांनी मौन राखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा यांनी या निर्णयाचे अगोदर स्वागत केले होते व नंतर टीकाही केली होती.
संघ पदाधिकारी सोबत
संघ मुख्यालयात देशातील मोठ्या असामींची अधूनमधून वर्दळ असते. सत्ता परिवर्तनानंतर येणाऱ्या ‘व्हीआयपीं’चे प्रमाण वाढीस लागले आहे. कुणालाही संघातर्फे विशेष वागणूक दिली जात नाही. मात्र रतन टाटांसाठी मात्र संघाने अक्षरश: ‘रेड कार्पेट’च अंथरले. विमानतळावरील त्यांच्या आगमनापासून अखेरपर्यंत संघ पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
रतन टाटा यांचा बुधवारी ७९ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांचा हा दौरा आणखी विशेष झाला. सरसंघचालकांनी यावेळी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. संघ स्मृतिमंदिरात महानगर संघचालक राजेश लोया यांनी विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी संघाचे महानगर सहकार्यवाह अरविंद कुकडे व प्रचार प्रमुख समीर गौतम उपस्थित होते.
संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा
रतन टाटा यांनी संघाच्या विविध सेवाकार्यांबाबत स्मृतिमंदिर परिसरात जाणून घेतले. विविध प्रकल्पांची कार्यप्रणाली, संघ स्वयंसेवकांची भूमिका याबाबत देखील त्यांनी विचारणा केली. संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील आठवड्यात चंद्रपुरात
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे सुरू करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत प्रशासन व टाटा ट्रस्ट यांच्यात ५ जानेवारी रोजी सामंजस्य करार होणार आहे. संघाच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात बांबू प्रकल्प चालतात. देशी उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग समूहांतर्फे पुढाकार घेण्यात आला तर त्यामुळे ग्रामीण भागात जास्त उद्योगनिर्मिती होऊ शकेल, असे संघ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे टाटा यांचे संघस्थानी येण्याला महत्त्व आले आहे. (प्रतिनिधी)
ही औपचारिक भेट : संघ
या संदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ही भेट औपचारिक व पूर्वनियोजित होती, असे त्यांनी सांगितले. या भेटीचा राजकारण व उद्योगाशी काहीही संबंध नव्हता. रतन टाटा यांची अनेक दिवसांपासून संघस्थानाला भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार, ते येथे आले, असे संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.