डाळींचे दर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 05:24 AM2017-01-02T05:24:49+5:302017-01-02T05:24:49+5:30
आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात डाळींचे दर घसरले आहेत. प्रामुख्याने हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घट झाली आहे.
पुणे : आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात डाळींचे दर घसरले आहेत. प्रामुख्याने हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घट झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील दोन वर्षांत पावसाअभावी तुरीसह हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. उडीद, मूग, मटकीलाही याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे गेल्या एक-दोन वर्षांत सर्वच डाळींच्या दराने उच्चांक गाठला होता. तूर व उडीद डाळ १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचली होती, तर हरभरा डाळीनेही १५० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मूगडाळ व मटकीचे भावही शंभरीच्या घरात गेले होते.
यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतेक डाळींचे उत्पादन वाढले आहे. मात्र, अद्याप स्थानिक हरभऱ्याची आवक सुरू झालेली नाही. तसेच परदेशातूनही हरभऱ्याची आवक विलंबाने सुरू झाली. परिणामी मागील सहा महिन्यांपासून हरभऱ्याचे भाव तेजीत होते. सध्या आॅस्ट्रेलिया येथून हरभऱ्याची चांगली आवक सुरू झाल्याने भाव खाली आले आहेत. तुरडाळ व उडीद डाळीची आवकही चांगली होत असल्याने भावात घट झाली आहे. पुढील काही दिवसांत हे भाव आणखी उतरण्याची शक्यता आहे, असे डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)