पालकमंत्रीपद काढल्याने राठोड नाराज
By admin | Published: January 4, 2017 02:20 AM2017-01-04T02:20:06+5:302017-01-04T02:20:06+5:30
यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दल महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज झाले असून त्यांनी आज ही नाराजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली.
मुंबई : यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दल महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज झाले असून त्यांनी आज ही नाराजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली.
‘आपण प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आलो. जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढविली. अलिकडच्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. असे असताना आकसापोटी माझ्याकडून म्हणजे पर्यायाने शिवसेनेकडून पालकमंत्रीपद काढून घेतले या शब्दात राठोड यांनी ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ‘या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे सांगत ठाकरेंनी त्यांचे समाधान केल्याचीही माहिती आहे.
एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना ते आपल्याला कोणताही अधिकार देत नसल्याची राठोड यांची तक्रार होती. राठोड हे आतापर्यंत यवतमाळचे पालकमंत्री होते. तथापि, आता ते राज्यमंत्री मदन येरावार यांना देण्यात आले असून राठोड यांना यवतमाळचे सहपालकमंत्री करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
मंत्र्यांकडूनही नाराजी
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनीही राठोड यांचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दलची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखविली, असे समजते. शिवसेनेशी चर्चा करून हा निर्णय झाल्याचे म्हटले जाते.