डिसेंबरच्या धान्यापासून शिधापत्रिकाधारक वंचित; राज्यातील २४ लाख जणांना फटका; धान्यवितरणासाठी मुभा देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:00 IST2025-01-01T14:00:40+5:302025-01-01T14:00:57+5:30
बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये राज्यात सर्वांत मागे आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, गोंदिया, वर्धा, फ परिमंडळ ठाणे, ग परिमंडळ कांदिवली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर शहर या जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक वितरण पूर्ण झाले असले तरी अन्य जिल्ह्यांची धान्य वितरणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

डिसेंबरच्या धान्यापासून शिधापत्रिकाधारक वंचित; राज्यातील २४ लाख जणांना फटका; धान्यवितरणासाठी मुभा देण्याची मागणी
पुणे : उशिरा झालेला धान्यपुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचे धान्य वितरण रखडले आहे. परिणामी, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सुमारे २४ लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळेच उर्वरित धान्यवितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्य सरकारकडे केली.
बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये राज्यात सर्वांत मागे आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, गोंदिया, वर्धा, फ परिमंडळ ठाणे, ग परिमंडळ कांदिवली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर शहर या जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक वितरण पूर्ण झाले असले तरी अन्य जिल्ह्यांची धान्य वितरणाची टक्केवारी चिंताजनक आहे.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे शहर व ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांचा नियोजन शून्य कारभार आणि वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी या कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून अन्नधान्य निर्धारित वेळेत पोहोचण्यास विलंब होत आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला आहे. या जिल्ह्यातील काही दुकानांमध्ये डिसेंबरचे धान्य अजूनही पोहोचलेले नाही. परिणामी, धान्य वितरण मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यातील अनेक दुकानांपर्यंत महिन्याचे धान्य महिन्याच्या २५ तारखेनंतर पोहोचत आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
३३५ दुकानांचे धान्य वितरण शून्य
- डिसेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण ६ लाख ८३ हजार ७७६ एपीएल शेतकरी शिधापत्रिकांपैकी (३.९७ टक्के) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र १ कोटी ६५ लाख ८१ हजार शिधापत्रिकांपैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ४१ लाख ७१ हजार ५८२ शिधापत्रिकांचे धान्य वितरण पूर्ण झाले आहे.
- डम्हणजेच राज्यामध्ये अजूनही २४ लाख ९ हजार ४१८ शिधापत्रिकांचे धान्य वितरण प्रलंबित आहे. राज्यात अजूनही ३३५ दुकानांचे धान्य वितरण शून्य टक्के आहे. ७६८ दुकानांचे धान्य वितरण ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, तसेच २ हजार १२० दुकानांचे धान्य वितरण ६० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.