शौचालय नसल्यास रेशन बंद !
By admin | Published: January 3, 2017 04:39 PM2017-01-03T16:39:21+5:302017-01-03T18:49:07+5:30
तालुक्यातील ग्राम पंचायत पांगरी माळी येथे हागणदारीमुक्त गाव अभियान युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाचे 'राशन' बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला आहे.
गजानन गोरे/ऑनलाइन लोकमत
देऊळगावराजा (बुलडाणा), दि. 3 - तालुक्यातील ग्राम पंचायत पांगरी माळी येथे हागणदारीमुक्त गाव अभियान युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाचे 'रेशन' बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला आहे.
ग्रामपंचायत पांगरी माळी येथे आजवर २६० शौचालयांचे उद्दीष्ठ पुर्ण झालेले असून सुमारे ८५ टक्के उद्दीष्ठ पुर्णत्वाकडे असल्याची माहिती सरपंच अनुसयाबाई बाजीराव वाघ यांनी दिली. नुकतेच स्थानिक व्यंकटेश विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये स्वयंसेवकांनी शौचालयासाठी ७० खड्डे खोदलेत. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन केलेले आहे. तरीसुध्दा उर्वरीत कुटुंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी ग्राम पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ग्रामपंचायतने मासीक ग्राम सभेमध्ये शौचालय नसलेल्या कुटुंबांचे ह्यराशनह्ण बंद करण्याचा महत्वपुर्ण ठराव घेतला आहे. यामध्ये सदर कुटुंबाचे रेशन तसेच ग्रामपंचायत दाखले व महसूल दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने गाव संपूर्ण हागणदारीमुक्त होईल, असा विश्वास सरपंच पती तथा पाणलोट समितीचे अध्यक्ष बाजीराव (नाना) वाघ यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केला. तर सरपंच अनुसया बाजीराव वाघ यांनी सांगितले की, नविन शौचालयासाठी ग्रामस्थांंच्या कुठल्याही अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम राहील.
गाव शंभरटक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी तसेच स्मार्ट व्हिलेज व आय.एस.ओ.कडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून आपले गाव आदर्श बनविण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी आपल्या पाठीशी राहून आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे, असे ग्रा.पं.पांगरी माळीच्या सरपंच अनुसया बाजीराव वाघ यांनी सांगितले.
''शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना आपण स्वत:हून लागणारे साहित्य दगड, विटा, रेती, सिमेंट व इतर साहित्य पूरवून सहकार्य करू. गावाच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व आपले गाव आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न करून सहकार्य करावे,'' असे आवाहन पांगरी माळीच्या पाणलोट समितीचे अध्यक्ष बाजीराव वाघ यांनी केले.
.