रेशन दुकानदारांना बँक प्रतिनिधीचा दर्जा
By admin | Published: January 25, 2017 03:31 AM2017-01-25T03:31:46+5:302017-01-25T03:31:46+5:30
नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकड विरहित व्यवहार करण्यावर भर दिलेला असताना अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही सार्वजनिक वितरणप्रणालीत कॅशलेसपद्धती आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकड विरहित व्यवहार करण्यावर भर दिलेला असताना अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही सार्वजनिक वितरणप्रणालीत कॅशलेसपद्धती आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. रेशन दुकानदारांनाच प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना बँकेच्या सुविधा देण्यासाठी रेशन दुकानदारांना बँक प्रतिनिधीचा दर्जा देणार असल्याचे संकेत प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिले आहेत.
मंगळवारी नाशिक विभागातील सर्व पुरवठा अधिकारी, सहायक पुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. निरंजन देवळे ग्रुप सोसायटी रेशन दुकान क्रमांक तीन व सप्तशृंगी महिला बचत गट, कांचने यांनी रोखविरहित अन्नधान्य वितरण सुरू केल्याबद्दल पाठक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. रेशन दुकानदारांना पीओएस म्हणजेच पॉर्इंट आॅफ सेल या कंपनीकडून यंत्र पुरविण्यात येणार असून, रेशन दुकानदारांकडे हे यंत्र ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)