रेशन दुकानदारांचा परवाना होणार रद्द
By admin | Published: August 9, 2016 01:30 AM2016-08-09T01:30:47+5:302016-08-09T01:30:47+5:30
रेशन दुकानचालकांनी सुरू केलेला संप आठव्या दिवशीही कायम होता़ त्यामुळे संपकरी रेशन दुकानदारांच्या परवाना रद्दची कारवाई सुरू केली आहे़
पिंपरी : रेशन दुकानचालकांनी सुरू केलेला संप आठव्या दिवशीही कायम होता़ त्यामुळे संपकरी रेशन दुकानदारांच्या परवाना रद्दची कारवाई सुरू केली आहे़ ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे़
घरपोच माल वाहतूक व्हावी, धान्यवाटपाचे कमिशन वाढवून मिळावे, महामंडळ स्थापन करावे, या मागण्यांसाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी दि़ १ आॅगस्टपासून संप सुरू केला आहे़ स्वस्त धान्य दुकानदारांनी पुकारलेल्या संपावर कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहे़
अन्न सुरक्षा कायदयात येत्या दोन दिवसांत संपात सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांवर परवाना रद्दची कारवाई करणार असल्याचे कदम यांनी सांगितले ़सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त धान्य मिळावे, यासाठी संपात सहभागी नसलेल्या दुकानदारांना शेजारील विभागाचा माल जोडून देणार आहे़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शहरातील अनेक विभागातील गरिबांना किराणा मालाच्या दुकानातून जादा दराने माल विकत घ्यावा लागला़ शहरातील कार्डधारकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता पुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे़ दुकानदारांनी जुलै महिन्यातील माल उशिरा उचलल्याने ग्राहकांना तो वेळेत मिळाला आहे़
शहरात अजून तरी ग्राहकांना त्रास झाला नसल्याचे परिमंडळ अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले़ दरम्यान, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहील, अशी माहिती आॅल महाराष्ट्र फे अर प्राइज शॉपकिपर फे डरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिली़ सरकारने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली़ राज्यातील सर्व रेशन दुकानदार या संपात सहभागी झाले आहेत़ आम्ही परवानाधारक दुकानदार आहोत़ सरकार जाणूनबुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप बाबर यांनी केला़ (प्रतिनिधी)