रेशनिंग दुकानदार करणार आत्मदहन
By admin | Published: April 27, 2015 04:08 AM2015-04-27T04:08:09+5:302015-04-27T04:08:09+5:30
रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे
मुंबई : रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. परिणामी, एका आठवड्यात रेशनिंगवरील कमिशनवाढीवर निर्णय घेतला नाही, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय काही दुकानदारांनी घेतला आहे.
या प्रकरणी मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू म्हणाले की, १० रेशनिंग दुकानदारांनी संघटनेला लेखी पत्र देऊन कमिशनवाढीची मागणी केली आहे. सध्या शासन नियमानुसार दुकानदारांना गहू आणि तांदूळ विक्रीत २० पैसे कमिशन मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन दुकानदारांना १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने गहू आणि १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देते. तेच धान्य दुकानदार स्वस्त अन्नधान्य योजनेअंतर्गत कार्डधारकांना प्रत्येकी २ व ३ रुपये प्रति किलो दराने विकतात. मात्र एफसीआयच्या गोदामापासून दुकानापर्यंत वाहतूक आणि हमाली खर्च पाहता दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २० पैशांचा भुरदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे २ रुपये प्रति किलो दराने विकणारे गहू दुकानदारांना ३ दराने विकत घ्यावे लागत आहेत. तर ३ रुपये प्रति किलो दराने विकत घेणारे तांदूळ दुकानदार ४ रुपये दराने विकत घेत आहेत. त्यामुळे कमिशन दूरच मात्र प्रति किलो गहू आणि तांदळासाठी दुकानदारांना १ रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीत सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. कमिशनवाढीबाबत एका आठवड्यात सरकारने निर्णय घ्यावा किंवा किमान सकारात्मक चर्चा करावी, अशी मागणी इशारा देणाऱ्या दुकानदारांची आहे. अन्यथा आठवड्यात कधीही मंत्रालयासमोर जाऊन गळ्यात पाटी अडकवून आत्मदहन करण्याचा दुकानदारांचा इरादा आहे.