रत्नाकर बँकेच्या एटीएमवर दरोडा, साडेआठ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 02:00 PM2017-08-02T14:00:15+5:302017-08-02T14:10:45+5:30
रत्नाकर बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून साडेआठ लाख रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.
कोल्हापूर, दि. 2 - कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवर मुक्त सैनिक वसाहत येथील रत्नाकर बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून साडेआठ लाख रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रस्त्यालगत असलेल्या या एटीएम सेंटरचे मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा घेवून दरोडेखोर पसार झाले आहेत. गॅस कटरमुळे मशिन आतून पूर्ण जळाले आहे.
अधिक माहिती अशी, ताराबाई पार्क येथील रत्नाकर बँकेचे (आर. बी. एल) एटीएम मशिन मुक्त सैनिक वसाहत येथील रस्त्याकडेला आहे. त्याच्या शेजारी टुरो ट्रॅव्हल्स अॅन्ड टुरर्सचे कार्यालय आहे. गेल्या पाच वर्षापासून हे मशिन फॅजॅक्ट ट्रॅकशन टेकनॉलॉजी या कंपनीचे आहे. कंपनीचे कॅशियर सुनिल चौगुले व प्रशांत मुच्छंडी यांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मशिन तपासले असता त्यामध्ये ५ लाख ५० हजार रुपये होते. त्यामध्ये आणखी तीन लाखाची कॅश भरली. असे सुमारे साडेआठ लाख रुपये मशिनमध्ये होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा कॅशिअर चौगुले व मुच्छंडी कॅश भरण्यासाठी याठिकाणी आले.
बाहेरुन एटीएम सेंटरचे शर्टर बंद असल्याने त्यांना थोडी शंका आली. शर्टर उघडून पाहिले असता आतमध्ये मशिन फोडलेले दिसले. दरोड्याचा प्रकार दिसताच त्यांनी बँकेचे व्यवस्थापक महादेव चिकुर्डेकर यांना मोबाईलवरुन कळविले. त्यांनी काही प्रतिनिधींना तत्काळ घटनास्थळी पाठविले. एटीएम कंपनीचे प्रतिनिधी विनय हसबनिस आले. त्यांनी कंट्रोलरुमला फोनवर दरोड्याची माहिती दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे व शाहूपुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आले. त्यांनी एटीएम सेंटरची पाहणी केली. झेबा श्वान घटनास्थळी आले. मशिन जळाल्यामुळे दरोडेखोरांच्या हाताचे ठसे मिळून आले नाहीत. दूर्गंधी सुटल्याने श्वान माघारी परतले. शहरातील व शहराबाहेरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
असा टाकला दरोडा
कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला लागूनच हे एटीएम सेंटर असल्याने या मार्गावरुन ये-जा करणा-या लोकांच्या सहजासहजी नजरेस पडते. दरोडेखोरांनी रेकी करुन मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये घुसले. शर्टर बंद करुन आतील विज बंद केली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेºयाची केबल काढून टाकली. गॅस कटरने मशिनची डावी बाजू उभी कापल्याने थेट कॅश ठेवलेली चार कॅशेटस त्यांच्या हाती लागले.त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा सॅकमध्ये भरुन ते साहित्यासह पसार झाले. गॅस कटरने मशिन कापल्याने त्याच्या ज्वालाग्रही ठिणग्या उडून मशिन आतमधून पूर्णत: जळाले. त्याची दूर्गंधी सुटली होती. हा प्रकार कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून बाहेर पडताना त्यांनी पुन्हा शर्टर बंद करुन घेतले. सुमारे दोन तास दरोडेखोर आतमध्ये कॅश बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला.