बारसू रिफायनरीबाबत शरद पवार मध्यस्थी करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन! घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:51 PM2023-04-26T14:51:40+5:302023-04-26T14:53:24+5:30
Ratnagiri Barsu Refinery: बारसू रिफायनरीबाबत राजकीय वातावरण तापलेले असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
Ratnagiri Barsu Refinery: बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारसू रिफायनरीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बारसू येथील प्रकल्पामद्धे शरद पवार आता मध्यस्थी करणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेटही झाली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना मोलाचा सल्ला
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. सामंतांकडून बारसू रिफायनरीचा आढाला घेतला. कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. उद्याच्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. रिफायनरी आंदोलकांचे प्रश्न सोडले पाहिजेत. चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला दिला आहे. बारसूतील रिफायनरी बाबत चर्चा करायला हवी, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम १४४ लागू आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"