रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘वाटाण्याच्या अक्षताच’?

By admin | Published: January 16, 2015 11:25 PM2015-01-16T23:25:01+5:302015-01-16T23:41:41+5:30

नेतृत्त्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : मंत्रिमंडळ विस्तार, विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये संधी मिळण्याची शक्यता बनली धुसर

Ratnagiri district is again 'frozen'? | रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘वाटाण्याच्या अक्षताच’?

रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘वाटाण्याच्या अक्षताच’?

Next

रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, आणखी १२ मंत्र्यांचा समावेश होणार आहे. मात्र, यातील केवळ दोन मंत्रीपदे ही शिवसेनेला मिळणार असून, त्यासाठी सेनेचे राज्यातील अन्य रथी-महारथी रांगेत आहेत. परिणामी, मंत्रीपदाची आस लागलेले जिल्ह्यातील सेनेचे आमदार सदानंद चव्हाण व राजन साळवी, भाजपाचे विनय नातू व बाळ माने यांना संधी मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. तसेच विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांमध्येही जिल्ह्यातील सेना वा भाजपाच्या कोणत्याही नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार व विधानपरिषदेच्या रिक्त जागांबाबत जिल्ह्याच्या वाट्यास ‘वाटाण्याच्या अक्षता’च येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य विधान परिषदेचे सदस्य आशिष शेलार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून आल्याने, तसेच विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने, चार जागा रिक्त झाल्या आहेत. बहुमताच्या जोरावर या चारपैकी शिवसेनेला एक रिक्त जागा मिळणार असून, त्याजागी सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची वर्णी लागणार आहे. उर्वरित रिक्त जागांवर मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर यांच्या गटाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून भाजपाबरोबर आलेल्या या पक्षांच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करून, त्यांचा राग शमविण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून सेना-भाजपाच्या कोणत्याही नेत्याला या जागांवर संधी मिळेल, याची सूतराम शक्यता दिसत नाही.
रिक्त झालेल्या चार जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळात १२ नवीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याने, त्यात रत्नागिरीला स्थान असेल काय, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या १२पैकी सेनेच्या कोट्यातील २ मंत्रीपदे शिल्लक असून, त्यासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यास त्यात काही मिळेल, याची शक्यताच सध्या फेटाळली जात आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार व विधान परिषदेच्या रिक्त जागा यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली जाण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)

मंत्रीपदाची ‘तमन्ना’?
मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आहेत. यातील एकतरी मंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला येईल, अशी तमन्ना जिल्ह्यातील सेनेच्या आमदारांमध्ये आहे. आमदार सदानंद चव्हाण व आमदार राजन साळवी यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी दबाव वाढविला आहे. भाजपाची सत्ता राज्यात असल्याने, जिल्ह्यातील भाजपा सक्षम करण्यासाठी बाळ माने किंवा विनय नातू या माजी आमदारांना मंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपानेही त्यांच्या नेतृत्त्वावर दबाव वाढविला आहे. परंतु मंत्रीपदाची ही ‘तमन्ना’ वरिष्ठ नेतेही पूर्ण करू शकणार नाहीत, असेच चित्र आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार विधानसभेवर निवडून आल्याने, तर विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने चार जागा रिक्त.
रिक्त जागा मित्रपक्षांना देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार.

Web Title: Ratnagiri district is again 'frozen'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.