रत्नागिरीत चालकांनीच रोखली रेल्वे
By admin | Published: January 10, 2015 01:36 AM2015-01-10T01:36:45+5:302015-01-10T01:36:45+5:30
रत्नागिरी स्थानकात शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या सुमारे ५०पेक्षा अधिक चालक, गार्डस्नी निदर्शने करीत गुजरातकडे जाणारी कोचुवेली-भावनगर रेल्वे रोखली.
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-रोहा मार्गावरील गाड्यांमध्येही कोकण रेल्वेचेच चालक व गार्डस् हवेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी स्थानकात शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या सुमारे ५०पेक्षा अधिक चालक, गार्डस्नी निदर्शने करीत गुजरातकडे जाणारी कोचुवेली-भावनगर रेल्वे रोखली. त्यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या चालक (लोको-पायलट) व गार्ड्समधील गेल्या काही काळापासून सुरू असलेला क्षेत्राचा वाद चिघळला आहे. कोकण रेल्वेचे क्षेत्र रोह्यापर्यंत असताना मध्य रेल्वेचे चालक, गार्ड रत्नागिरीपर्यंत येतात. या मार्गावरही कोकण रेल्वेचेच चालक व गार्ड रेल्वेमध्ये असायला हवेत, अशी कोकण रेल्वे चालकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)