रत्नागिरी विभागातील पहिले स्थानक होण्याचा मान रत्नागिरी स्थानकालाच
By admin | Published: December 9, 2014 10:26 PM2014-12-09T22:26:02+5:302014-12-09T23:16:40+5:30
सुटणाऱ्या बसची माहिती ‘एलईडी डिस्प्ले’वर : आधुनिकतेची कास
मेहरुन नाकाडे :रत्नागिरी :बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा ग्रामीण भागाची ‘जीवन वाहिनी’ ठरली आहे. रत्नागिरी बसस्थानकात एस. टी.चे मार्ग दाखवणारे एलईडी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. त्यावर गाडीचे नाव, फलाट क्रमांक, गाडीची वेळ व मार्ग दर्शविण्यात येत आहेत. एकूण चार एलईडी स्क्रीन डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. रत्नागिरी विभागातील एलईडी डिस्प्ले लावणारे रत्नागिरी बसस्थानक पहिले आहे.
रत्नागिरी बसस्थानक लवकरच आपले रूपडे पालटणार आहे. बीओटी तत्त्वावर अद्ययावत बसस्थानक बांधण्यात येणार आहे. अद्याप बांधकामाला प्रारंभ झाला नसला तरी जुन्या बसस्थानकातही नवीन प्रयोग सुरू आहेत. त्याच अनुषंगाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार वृत्ती सोल्युशन प्रा. लि. कंपनीने डिजिटल डिस्प्ले बसविले आहेत.
रत्नागिरी विभागात एस. टी.च्या ७९० गाड्या असून, त्यामध्ये लवकरच नवीन १०० गाड्यांची भर पडणार आहे. दररोज ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. दररोज एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. त्यासाठी किमान ३०,१५,५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागास ६५ लाख रूपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक असून, सध्या २४० चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. दरमहा ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, गेल्या दहा महिन्यात १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रत्नागिरी विभागाचे पूर्वी प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु सध्या उत्पन्नात वाढ झाली असून, ६५ लाख इतके झाले आहे. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच ऊन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विभागाला नुकतीच ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे.
डिस्प्ले बोर्डवर गाडीचे नाव व मार्ग दाखवण्यात येत आहे. सध्या दाखवण्यात आलेल्या सूचनांमध्ये काही किरकोळ चुका वगळल्या, तर प्रवाशांना कोणती गाडी , तिचा फलाट क्रमांक, सुटण्याची वेळ शिवाय कोणत्या मार्गाने जाणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. वृत्ती सोल्युशन कंपनीकडे बसस्थानकांतील गाडी व मार्ग यांच्या उद्घोषणेचा ठेका देण्यात आला आहे.
विभागातील गाड्या ७९०
नवीन येणाऱ्या गाड्या१००
दररोजच्या फेऱ्या४५००
चालक१४७३
वाहक१६००
प्रशिक्षण सुरू २४०
असणारे चालक
रोजचे किलोमीटर२,१६,०००
रोज लागणारे डिझेल५०,००० ली.
दररोजचा खर्च३०,१५,५०० रूपये