रत्नागिरीचा निकाल ९६.३४ टक्के
By admin | Published: June 8, 2015 10:30 PM2015-06-08T22:30:54+5:302015-06-09T00:59:51+5:30
दहावी परीक्षा : जिल्ह्याचे दणदणीत यश
रत्नागिरी : स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान राखणाऱ्या कोकण बोर्डात दहावी परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक दुसरा असला तरी ९६.३४ टक्के निकालाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. रत्नागिरीच्या सिद्धी बाळकृष्ण झोरे हिने बोर्डात अव्वल येऊन जिल्ह्याच्या यशाला आणखीनच झळाळी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २६ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.३४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १२ हजार ९५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १२ हजार ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत रत्नागिरीपेक्षा ०.०६ टक्क्याने बाजी मारत अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट यशामुळे सर्वच शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)
सायबर कॅफेत गर्दी
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनमुळे बहुतांश घरात इंटरनेट सुविधा असल्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर उपलब्ध होताच नंबर पाहण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.
१३७ शाळांचा निकाल १०० टक्के
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३८७ शाळांमधील १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण २६ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १४ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ताप्राप्त केली आहे. प्रथम श्रेणीत ९ हजार ६१५, व्दितीय श्रेणीत ८ हजार २३१, तृतीय श्रेणीत १९९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींचा झेंडा
रत्नागिरी जिल्ह्यातून १३ हजार ८६८ मुलगे परीक्षेला बसले होते, पैकी १३ हजार ३३३ मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.१४ टक्के इतके आहे. तसेच जिल्ह्यातून १२ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १२ हजार ५२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५५ टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.४१ टक्क्यांनी अधिक आहे.
पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५१.१६ टक्के
रत्नागिरी जिल्ह्यातून १२९८ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी बसले होते, पैकी ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ५१.१६ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पैकी १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५०.९४ टक्के इतका निकाल लागला आहे.