रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल 2019: विनायक राऊत आघाडीवर, निलेश राणे 51 हजार मतांनी मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:43 AM2019-05-23T11:43:17+5:302019-05-23T11:44:40+5:30
ratnagiri-sindhudurg Lok Sabha Election 2019 live result & winner
सिंधुदुर्गः नारायण राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात असून, राणे फॅक्टर पुन्हा चालणार का, याचीच सगळीकडे चर्चा आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यामुळे विनायक राऊत, स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे आणि काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर अशी तिरंगी लढत असली तरी खरा मुकाबला हा निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्येच आहे.
निलेश राणेंसह नारायण राणेंनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यानं त्यांचा प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. या निवडणुकीत विनायक राऊत यांचा निलेश राणेंच्या माध्यमातून थेट सामना नारायण राणेंशी असल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांनी 12,6797 मतं मिळाली असून, निलेश राणे यांच्या पारड्यात 74,993 मतं पडली आहेत. विनायक राऊत हे 51 हजार 804 मतांनी आघाडीवर आहे.
या मतदारसंघात 13,67,361 मतदार असून, 8 लाख 74 हजार 306 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच या मतदारसंघात 61.69 टक्के मतदान झालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी तब्बल 1 लाख 50 हजार 51 मतांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 49,3088 मतं मिळाली होती, तर निलेश राणे यांना 34,3037 एवढं मतदान झालं होतं.