नारायण राणेंनी गड राखला; 47,918 मताधिक्क्याने उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:32 PM2024-06-04T17:32:26+5:302024-06-04T17:33:09+5:30
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे.
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (lok sabha result 2024) महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांचा विजय झाला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर गेले होते, पण नंतर त्यांनी जोरदार मुसंडी मारली आणि अखेर 47,918 मताधिक्क्याने उद्धव सेनेच्या विनायक राऊत (vinayak Raut) यांचा पराभव केला.
विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वाचपा नारायण राणे यांनी या निवडणुकीत काढला. राणेंसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. कारण, त्यांचा सामना थेट उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याशी होता. ठाकरे आणि राणे घराण्यातील वैर सर्वश्रुत आहे, अशा परिस्थितीत शिवसेनेकडून राणेंविरोधात जोरदार प्रचार केला होता. तर, आपल्या वडिलांसाठी राणेंचे दोन्ही पूत्र मैदानात उतरले होते. त्यांच्या प्रचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा फायदा अखेर राणेंना झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधून विनायक राऊत यांना आघाडी मिळेल, हे गणित आधीपासूनच अपेक्षित धरले जात होते. मात्र रत्नागिरीतील तीनही मतदार संघात विनायक राऊत यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा अधिक आघाडी नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमधून मिळाली. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तीनही मतदारसंघांमधून नारायण राणे यांना प्रत्येक फेरीमध्ये मोठी आघाडी मिळाली.