लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:28 PM2024-06-07T16:28:05+5:302024-06-07T16:28:21+5:30
पालकमंत्री असूनही उदय सामंत यांनी आघाडी मिळवून दिली नाही असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता
Nilesh Rane VS Uday Samant : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे हे विजयी झाले आहेत. मात्र निकालावरुन राणे पुत्रांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश राणेंनी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधु किरण सामंत यांच्याबाबत धक्कादायक विधान केले. किरण सामंत हे या निवडणुकीत उद्धव अन् रश्मी ठाकरेंना भेटले, असा मोठा दावा भाजपचे युवा नेते निलेश राणेंनी केला होता. तसेच पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना आघाडी का मिळवून देऊ शकले नाहीत असाही सवाल निलेश राणे केला होता. आता राणेंच्या या प्रश्नाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच निलेश राणे यांनी शिंदे गटाच्या मतदारसंघाबाबत केलेल्या विधानावरूनही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्यावर आरोप केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावरही जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असे म्हणत निलेश राणेंनी इशारा दिला होता.
"पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत," असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.
दुसरीकडे नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणेंनी उदय सामंत यांच्या रत्नागिरी तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. यापुढे जात निलेश राणेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रत्नागिरी मतदारसंघाबाबत भाष्य केलं. "नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार," असं विधान निलेश राणेंनी केलं होतं.
या सगळ्या प्रकारावरुन आता शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. निलेश राणेंच्या आक्षेपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही सगळ्यांनी मिळून नारायण राणे यांना ७५ हजार मतांपर्यंत पोहोचवले होते. हे नारायण राणे यांनाही माहिती आहे. त्यामुळे माझा रत्नागिरी मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याची सगळी तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे त्यातून त्यांनी माहिती घ्यावी. त्यातून उदय सामंत पालकमंत्री म्हणून कमी पडला असेल तर त्यांनी जाहीर करावे. लोकशाहीमध्ये कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निलेश राणेंना मतदारसंघ मागितला असेल," असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.