रौफची आर्थर रोड कारागृहात रवानगी
By admin | Published: November 12, 2016 03:55 AM2016-11-12T03:55:39+5:302016-11-12T03:55:39+5:30
संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला व त्यानंतर फरारी झालेला अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
मुंबई : संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला व त्यानंतर फरारी झालेला अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने मर्चंटची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचा आदेश पोलिसांना दिला.
दहा वर्षे शिक्षा भोगल्यावर मर्चंटने पॅरोलसाठी अर्ज केला. त्याचा अर्ज मान्य करण्यात आला. या संधीचा फायदा घेत मर्चंट फरारी झाला. त्याने थेट बांगलादेश गाठले. भारत-बांगलादेशाची हद्द बेकायदेशीरपणे पार केल्याने त्याला तेथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने त्याचा ताबा मागितला. मुंबईत आल्यानंतर त्याला गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. कारण २०१०मध्ये उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना मर्चंटला शोधून काढून न्यायालयापुढे हजर करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी मर्चंटला सत्र न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार शुक्रवारी मर्चंटला विशेष न्यायालयाचे न्या. आर. एम. जोशी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्या. मोरे यांनी मर्चंटची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचा आदेश पोलिसांना दिला. (प्रतिनिधी)