भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा रावसाहेब दानवेंकडे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:27 PM2020-01-15T12:27:34+5:302020-01-15T12:28:22+5:30
भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई - राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात आता पुन्हा एकदा खासदार आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव शर्यतीत आले आहे. त्यामुळे जालन्याला पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपने अनेक निवडणुकांत यश मिळवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अनेक जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला होता.
दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रदेशाध्यक्षपद तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तर दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीयमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीत 2014 पेक्षा कमी जागा आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यातच महाविकास आघाडीचे वाढते वर्चस्व पाहता भाजपला आक्रमक प्रदेशाध्यक्षांची गरज आहे.
भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.