रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचे निधन
By admin | Published: January 28, 2015 04:51 AM2015-01-28T04:51:28+5:302015-01-28T13:55:46+5:30
रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी शशीकलातार्इंसह एक मुलगा, सून, मुली, नातू, तसेच ‘रयत’ परिवार आहे.
श्रीरामपूर येथील महादेव मळ्यात मंगळवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री गोविंदराव आदिक, शंकरराव कोल्हे, मधुकर पिचड, डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब म्हस्के, रयतचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील आदी उपस्थित होते.
ते २००८ पासून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व सुमारे ३० वर्षे उपाध्यक्ष होते. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, फर्डे वक्ते, वकील अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. राष्ट्रपतींपासून सरपंचापर्यंत, पत्रकारापासून चित्रकारापर्यंत मैत्री जपणारे ते दिलदार मित्र अशी त्यांची ओळख होती.
महादेव मळ्यात येणाऱ्या मदर तेरेसा, बाबा आमटे, शरद पवारांपासून ते शेतातल्या गड्यापर्यंत सर्वांचे आदरातिथ्य करणारे त्यांचे व्यक्तीमत्व चर्चेत होते. ‘नॉलेज इज पॉवर’ म्हणत रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून ज्ञान पंढरीची दिंडी सुरू केली. विज्ञानाची,परिवर्तनाची पताका स्वत: हाती घेऊन अग्रभागी राहिले. त्यामुळेच ‘अंतिम सत्याकडे’ शीर्षकाचे इच्छापत्र लिहून ‘आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा’ असे १४ सप्टेंबर १९९५ रोजीच लिहून ठेवले होते. (प्रतिनिधी)