अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी सावंतचा संशयास्पद मृत्यू; सर्वत्र खळबळ
By Admin | Published: July 2, 2016 01:38 AM2016-07-02T01:38:34+5:302016-07-02T01:38:34+5:30
मुंबई अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी उर्फ रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा गुरुवारी मध्यरात्री नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2- मुंबई अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी उर्फ रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा गुरुवारी मध्यरात्री नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, रवीचे नातेवाईक नागपुरात आल्यानंतरच त्याचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.
जोगेश्वरीत राहणा-या रवी सावंतचा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये १९९० ते ९४ पर्यंत प्रचंड दरारा होता. त्याच्या नावाने मुंबईतील व्यापारी, उद्योजकच नव्हे तर खतरनाक गुन्हेगारांनाही थरकाप सुटत होता. खंडणी वसुली, अपहरण आणि अनेक हत्या प्रकरणात नाव घेतल्या जाणा-या रवीविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१/९४ नुसार १९९४ मध्ये टाडा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ३ / २ टाटा कायद्यानुसार मुंबई सत्र न्यायालयाने ७ सप्टेंबर १९९६ ला रवीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी मुंबईतील कारागृहातही अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. रवीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत त्याला १९ सप्टेंबर १९९६ ला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून रवी येथेच शिक्षा भोगत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ जुलैच्या रात्री ७ वाजता त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. रवीच्या मृत्युप्रकरणी मेडिकल, कारागृह तसेच पोलीस प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (१ वाजता) या प्रकरणी धंतोली ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लोकमतला हे माहित पडताच रवीच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पोलीस अथवा मेडिकल प्रशासनाकडून विस्तृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन
रवीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अहवाल ध्यानात घेता त्याचे शवविच्छेदन करण्याचे तूर्त टाळण्यात आले. त्याचे नातेवाईक मुंबईतून आल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांनी लोकमतला सांगितले. त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून, शनिवारी दुपारपर्यंत ते नागपुरात येतील, अशी अपेक्षाही ठाणेदार माने यांनी व्यक्त केली.