"गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबाबत पाच-सहा वर्षापासून शंका", रावेर शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:30 AM2022-06-27T08:30:22+5:302022-06-27T08:34:15+5:30
Gulabrao Patil: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला पाच- सहा वर्षापासून शंका आली होती. सत्तेचा लाभ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच दिला, असे माझे निरीक्षण होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी येथे बोलताना केला.
जळगाव - जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला पाच- सहा वर्षापासून शंका आली होती, सत्तेचा लाभ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच दिला, असे माझे निरीक्षण होते. माझ्या या अहवालावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असतानाच त्यांच्यासह राज्यातील आमदारांनी बंडखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी येथे बोलताना केला.
रावेर येथील विवेकानंद विद्या मंदिराच्या सभागृहात रविवारी आयोजित रावेर व यावल तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पारकर म्हणाले की, ज्यांना सारे शिवसैनिक ढाण्या वाघ म्हणत होते, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठीच काम केले. शिवभोजन थाळीची कंत्राटे तसेच अन्य शासकीय कामांचे कंत्राटेही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच दिली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विचारही केला नाही.
याबाबतची माहिती मला होती, संधी मिळेल तेव्हा गुलाबराव पाटील पक्ष सोडून जातील, असे माझे निरीक्षण मी पक्षश्रेष्ठींकडे लेखी स्वरूपात दिले होते. ते भाजपधार्जिणे असल्याचे आपली शंका खरी ठरली. त्यामुळेच आपण कधीही गुलाबराव पाटलांकडे पक्ष वाढीचा किंवा कोणताही विषय घेऊन कधीही गेलो नाही, असेही पारकर यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांच्याबद्दल शंका आल्यामुळेच जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेशाचा विषय देखील त्यांच्यापासून लांब ठेवण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटी येथे गेलेले आमदार हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ईडीची कारवाई टाळण्यासाठी गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.