रवी अग्रवालने पोलिसांना दिले खेळण्याचे पिस्तूल

By admin | Published: August 13, 2016 09:49 PM2016-08-13T21:49:39+5:302016-08-13T21:49:39+5:30

हजारो कोटींच्या डब्बा सट्टेबाजीचा सूत्रधार रवी अग्रवाल याने गोळीबार प्रकरणात सावरासावर करताना पोलिसांच्या हाती खेळण्याचे पिस्तूल (टॉय गन) दिले

Ravi Agarwal handed the pistol to the police | रवी अग्रवालने पोलिसांना दिले खेळण्याचे पिस्तूल

रवी अग्रवालने पोलिसांना दिले खेळण्याचे पिस्तूल

Next
>- ऑनलाइन लोकमत
म्हणे गंमत म्हणून केली ‘फिल्मी फायरिंग‘ : व्हिडीओ क्लीप बाबत मौन 
 
नागपूर, दि. 13 - हजारो कोटींच्या डब्बा सट्टेबाजीचा सूत्रधार रवी अग्रवाल याने गोळीबार प्रकरणात सावरासावर करताना पोलिसांच्या हाती खेळण्याचे पिस्तूल (टॉय गन) दिले. व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे आपली मानसिक अवस्था बिघडली होती. त्यातून आपण दोन वर्षांपूर्वी याच खेळण्याच्या पिस्तुलातून गंमत म्हणून ‘फिल्मी फायरिंग‘ केली होती, असं त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. विशेष म्हणजे, अग्रवालने दिलेले पिस्तूल अन् बयान घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यामुळे या प्रकरणाची हवा आणखीच गरम झाली आहे. 
समांतर शेअर मार्केट चालवून हजारो कोटींची सट्टेबाजी करणा-या रवी अग्रवालचा डब्बा व्यापार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ठिकठिकाणच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे घातले. त्याच्या भावासह काही साथीदारांनाही अटक केली. तो मात्र फरार झाला. तब्बल अडीच महिने पोलिसांना गुंगारा देणा-या रवी अग्रवालला अटकपूर्व जामिन मिळाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याचा आणि साथीदार गोपी मालू याचा हवेत गोळीबार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर अग्रवाल आणि मालू या दोघांविरुद्ध शुक्रवारी कळमना पोलिसांनी गोळीबार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. मात्र, अग्रवालने येथेही पोलिसांच्या पुढचे पाऊल टाकले. अटक करण्यापूर्वीच अग्रवालने गुन्हेशाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या नावे पत्र दिले. आपण गंमत म्हणून खेळण्याच्या पिस्तुलातून ‘फिल्मी फायरिंग‘ केल्याचे त्याने सांगितले. परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार यांची भेट घेऊन अग्रवालने आपले बयान दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्याने व्हिडीओ क्लिपमध्ये (सारखे) दिसणारे माउझर (पिस्तूल) पोलिसांना दिले. 
कळमन्यातील आपल्या आलीशान निवासस्थानाच्या टेरेसवरून रवी अग्रवाल आणि त्याचा साथीदार गोपी मालू या दोघांनी दोन माउझर हातात धरून गोळया झाडल्या. गोळी झाडताना मालू याने ‘हमारे दुश्मनोंको लगता था के अब हम कभी बाहर (पोलिसांच्या कस्टडीतून) आ नही सकते... ये उनके नाम...!‘ असे म्हणत गोळी झाडली, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये दिसते. 
सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवालने ही ‘फिल्मी फायरिंग’ दोन वर्षांपूर्वी केल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. अर्थात दोन वर्षांपूर्वी अग्रवाल आणि गोपी कोणत्या केसमध्ये अडकला होता आणि तो पुन्हा कसा बाहेर येणार नव्हता, हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तूर्त पोलिसांनी बयान नोंदविल्यानंतर त्याला मोकळे केले आहे. व्हिडीओ क्लीप आणि त्यातील वक्तव्याबाबत अग्रवालच्या बयानावर पोलिसांनी तूर्त विश्वास केल्याने चर्चेचा बाजार गरम झाला आहे. 
 
निवासस्थानाची केली तपासणी 
सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवाल आणि मालूने ही ‘फिल्मी फायरिंग‘ कळमन्यातील मिनी माता नगरात असलेल्या अग्रवालच्या स्कायलाईन ईमारतीतील आलिशान निवासस्थानातून केली होती. पोलिसांनी या ईमारतीचीही तपासणी केली आहे. 

मालू गेला गोवा सफरीवर 
या खळबळजनक प्रकरणाचा बोभाटा होताच अग्रवालचा साथीदार गोपी मालू गोवा सफरीवर गेल्याची चर्चा आहे. या संबंधाच्या विस्तृत माहितीसाठी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल ‘नो रिप्लाय’ होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती उघड होऊ शकली नाही. 
 

Web Title: Ravi Agarwal handed the pistol to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.