"खोक्यांचे सत्य समोर येऊ नये म्हणून रवी राणा-बच्चू कडू यांच्यात समेट घडवला"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 03:12 PM2022-10-31T15:12:57+5:302022-10-31T15:13:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
Bachchu Kadu Ravi Rana Disputes: "गुवाहाटी येथील खोक्यांच्या चर्चेचे सत्य राज्यातील जनतेसमोर कधीच येऊ नये या दृष्टीकोनातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करुन समेट घडवून आणला. सुरतमार्गे गुवाहाटीतील खोक्यांचे सत्य जनतेसमोर येणे अपेक्षित होते. मात्र ज्या पध्दतीने दोघांना गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता काही काळ तरी गप्प बसले जाईल, मात्र खोक्यांचे सत्य एक ना एक दिवस जनतेसमोर नक्कीच येईल," असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. खोक्यांबद्दलची सत्यता आता तरी झाकण्यात आली आहे, पण लवकरच हे सत्य जनतेसमोर येईल, असा खोचक टोला लगावत या संदर्भातील विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.
"राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती ही स्वाभिमानाच्या मुद्द्यावर झाली याची कल्पना खासदार सुजय विखे-पाटील यांना नसावी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे पवार कुटुंब आहेत. ते विखे कुटुंब नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर, शरद पवार यांच्यावर राज्यातील तमाम जनतेचा, कष्टकरी, मजूरांचा, महिला वर्गाचा, उद्योग क्षेत्रातील लोकांचा विश्वास आहे. सत्तेसाठी तडजोड राष्ट्रवादी किंवा शरद पवार करत नाहीत. पाच वर्षे सत्तेबाहेर राहिलो. आजही सत्तेबाहेर राहून झपाट्याने पक्षाची वाढ होत आहे, हे कदाचित खासदार सुजय विखे-पाटील यांना माहित नसावे. जे विखे कुटुंब सत्तेसाठी इकडे तिकडे कुठल्याही पक्षात विलीन होते, त्यांनी अशी टीका करु नये," असा टोमणाही महेश तपासे यांनी लगावला. म्हणाले.
कडू-राणा वादावर अखेर पडदा पडला!
गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यानंतर आमदार रवी राणांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यासाठी वापरलेले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्ये निघाली असतील, तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असेही आमदार रवी राणा म्हणाले.