“आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई, राज्यात अशी दडपशाही झाली नाही”; रवी राणांची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:31 PM2022-05-06T17:31:02+5:302022-05-06T17:32:23+5:30

महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे, असा टोला रवी राणा यांनी लगावला.

ravi rana criticised cm uddhav thackeray over navneet rana and him police action of sedition act | “आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई, राज्यात अशी दडपशाही झाली नाही”; रवी राणांची ठाकरे सरकारवर टीका

“आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई, राज्यात अशी दडपशाही झाली नाही”; रवी राणांची ठाकरे सरकारवर टीका

Next

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून झालेल्या राजकीय रणधुमाळीनंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होता. राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली आहे. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. यानंतर रवी राणा यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून, राज्यात अशी दडपशाही झाली नव्हती, या शब्दांत रवी राणा यांनी निशाणा साधला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ज्या राज्यांमध्ये महिलांचा सन्मान केला जातो. त्या महाराष्ट्रात एका महिलेला चुकीची वागणूक दिली. सहा दिवसांआधी नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात  आले नव्हते. त्यांना त्रास देण्यात आल्याने त्या दु:खी असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दडपशाही कधी झाली नव्हती, असा आरोपही रवी राणा यांनी यावेळी केला. 

सरकारकडून एका महिलेचा मोठा अपमान

सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई झाली असून सरकारकडून एका महिलेचा मोठा अपमान झाला आहे. तुरुंगात नवनीत राणांना दिलेली वर्तवणूक अयोग्य होती. तुरुंग प्रशासन राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. तुरुंग प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या आदेशाने त्रास दिला असल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत असे समजले आहे. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वीज, खते, उद्योगधंदे यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑनलाइन शाळादेखील ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री अजूनही ऑनलाइन येतात. राज्यात त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरावे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्न लोकांना पडला असल्याचा टोला रवी राणा यांनी लगावला. 

दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सरकार विरोधात कट केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात १२४ अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्याबाबत कोर्टाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असून, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम १२४ अ हे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते, असे कोर्टाने म्हटले आहे. सत्र न्यायालयाचा हा निकाल राज्यातील ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 

Web Title: ravi rana criticised cm uddhav thackeray over navneet rana and him police action of sedition act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.