"महिलांकडून १५०० रुपये परत घेणार"; टीका होताच राणांचे स्पष्टीकरण, म्हणाले, "मी जे बोललो ते..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:55 PM2024-08-12T19:55:52+5:302024-08-12T20:04:15+5:30
ज्या महिला मला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार असं विधान रवी राणा यांनी केलं आहे.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलेच पेटलं आहे. अर्थसंकल्पात महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. या योजनेचे दोन हप्ते लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. विरोधकांनी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडणार असल्याचे म्हटलं आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातीलच एका आमदाराने या योजनेबाबत धक्कादायक वक्तव्य करत घुमजाव केलं आहे.
निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाप्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिलांना हजेरी लावली होती. त्यावेळी तुमच्या खात्यातून १५०० रुपये काढून घेणार म्हणताच सर्वांना धक्का बसला. राणांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून समाचार घेतला जात आहे. त्यामुळे आता रवी राणा यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही. यावरून कुणीही राजकारण करू नये. आम्हाला जर मतं मिळाली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे देण्यात येणारे १५०० रुपये काढून घेतले जातील असं विधान रवी राणा यांनी केलं होतं. या विधानानंतर टीकेची झोड उठल्यामुळे रवी राणा यांनी याबाबत भाष्य केलं आहे. आपण गमतीने हे वक्तव्य केल्याचे रवी राणा यांनी म्हटल आहे.
"आपण गमतीने हे वक्तव्य केलं. बहीण भावाचे नाते आपुलकीचे असलं पाहिजे. मी जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून मतदान घेतलं, पण हे सरकार तसं करणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे," असं रवी राणा म्हणाले.