“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:34 PM2024-09-02T17:34:47+5:302024-09-02T17:35:52+5:30
Ravi Rana News: नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. विकास थांबला आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.
Ravi Rana News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. महायुतीतील नेतेही पलटवार करत आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेत चित्र दिसावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाविषयी मोठे भाष्य केले आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. रवी राणा हेही जोरदार तयारीला लागले आहेत. रवी राणा यांनी मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दल विधान केले.
मागील लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून लढवली होती आणि विजय मिळवला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत नाराज होते. यातच काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यासंदर्भात रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा लोकसभा निवडणूक जिंकली असती, तर...
गेली पाच वर्षे नवनीत राणा यांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्कही ठेवला. मात्र तरी त्यांना निवडणुकीत घरी बसावे लागले. नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या, तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या. नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला. खूप मेहनत केली. पण आता ती खड्ड्यात गेली. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की, जो २० दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. जर असेच होत राहिले तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत, असे रवी राणा म्हणाले.
दरम्यान, नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. काही मूठभर नेत्यांनी ठरवले होते की, नवनीत राणा यांचा पराभव करायचा, पण लक्षात ठेवा त्यांच्या मनासारख झाले असले तरी या जिल्ह्याचा विकास थांबला आहे. काही नेत्यांनी मला पाडायचे हे ठरवले असले तरीही जनतेची ताकद माझ्यासोबत आहे. ते मला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.