राणाविरुद्ध शिवसेना वाद पेटला; अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 08:01 AM2022-05-05T08:01:40+5:302022-05-05T08:01:59+5:30
अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली.
अमरावती – हनुमान चालीसा वादावरून काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असं आव्हान आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र राणा दाम्पत्याच्या आव्हानानंतर शिवसैनिकांनी संतप्त भूमिका घेत राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन केले. अमरावती तसेच मुंबईतील खार निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.
हनुमान चालीसा पठण करणार असा ठासून सांगणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक २ दिवस रस्त्यांवर उतरले होते. काहींनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं होते. राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत राजद्रोहाचा खटला भरला. त्यानंतर अखेर १४ दिवसांनी राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर अमरावतीत मोठा जल्लोष करण्यात आला. युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र याचवेळी राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला.
अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमरावती येथील शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार राणांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पेट्रोल बॉटल आढळली. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी ४ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं असून शहरात तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर
मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास १३ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे अमरावतीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अमरावतीतील राणा यांच्या घरी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशावर ताल धरला होता.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर या दाम्पत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.