Ravi Rana : "संजय राऊतांना ईडीकडून अटक, आता अनिल परबांचा नंबर, तेही जेलमध्ये जातील"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:55 AM2022-08-01T11:55:52+5:302022-08-01T12:06:30+5:30
Ravi Rana Slams ShivSena Sanjay Raut And Anil Parab : "संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील."
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मॅरेथॉन चौकशीनंतर रात्री ईडीने संजय राऊतांना अटक केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीने राऊतांना अटक केल्याची घोषणा केली. याच दरम्यान रवी राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
"गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल" असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच "महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. भाजपाला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली."
"उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, यामागे सुद्धा संजय राऊत होते, पण आता सारं बदललं आहे. राऊत जेलमध्ये गेलेत. हळूहळू एकएकाचा नंबर लागेल. राऊतांनंतर आता अनिल परबांचा नंबर आहे, तेही जेलमध्ये जातील" असं म्हणत रवी राणा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. भाजपाने "भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"
"भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच दोन फोटो देखील शेअर केले आहेत. सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला? असं त्या फोटोंवर लिहिलं आहे. "चढ़ता है सूरज ढलता है, यह झूठ न ज़्यादा चलता है, पल दो पल का उजाला है झूठ का, अरे काला है जी काला, मूह काला है झूठ का" असं देखील अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.