विद्यापीठात राविकाँ-अभाविपची युती
By admin | Published: October 21, 2014 12:58 AM2014-10-21T00:58:39+5:302014-10-21T00:58:39+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संयुक्त विजय प्राप्त करून विद्यापीठावर आपला झेंडा
विद्यार्थी संघ निवडणूक : फुलेकर अध्यक्ष व मट्टमवार सचिव
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संयुक्त विजय प्राप्त करून विद्यापीठावर आपला झेंडा फडकविला आहे. सोमवारी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष व सचिवपदाची निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उमेदवार नीतेश फुलेकर विजयी झाला असून, सचिवपदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बालाजी मट्टमवार याने बाजी मारली. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांपर्यंत राविकाँ व अभाविप या दोन्ही विद्यार्थी संघटना निवडणुकीची वेगवेगळी तयारी करीत होते. परंतु सोमवारी ऐनवेळी या दोन्ही संघटनांनी हातमिळवणी करून युती केली. या दोन्ही संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या मते, तिसऱ्या संघटनेला रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. या दोन्ही संघटनांची युती झाली नसती तर त्याचा फायदा एनएसयूआय व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेला झाला असता. त्यामुळे रणनीतीचा एक भाग म्हणून या दोन्ही संघटनांनी ऐनवेळी हात मिळविला. यानंतर संख्याबळाच्या आधारे राविकाँला विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद देण्यात आले, तसेच अभाविपने सचिवपद स्वीकारले. युतीमुळे दोन्ही संघटनांना सहज विजय प्राप्त करता आला.
विद्यापीठात नवे समीकरण
नवनिर्वाचित सचिव बालाजी मट्टमवार याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याला आपली प्राथमिकता राहणार असल्याचे यावेळी सांगितले. तो पुढे म्हणाला, यासाठी विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार केले जाईल. त्या माध्यमातून विद्यार्थी आपली समस्या विद्यार्थी संघापर्यंत पोहोचवू शकेल. लगेच त्या समस्येचे समाधान केले जाईल. (प्रतिनिधी)