विखे पाटील कायम सत्तेच्या मागे धावणारे नेते : रविकांत तुपकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 05:12 PM2020-02-20T17:12:31+5:302020-02-20T17:13:49+5:30
विखे पाटील यांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर नेहमी त्यांच्या भूमिका बदलत गेल्या आहे.
मुंबई : भाजप आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावरूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विखे पाटील कायम सत्तेच्या मागे धावणारे नेते असल्याची टीका त्यांनी केली आहे.
विखे यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. तर या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे विखे पाटील हे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती.
यावर बोलताना तुपकर म्हणाले की, विखे पाटील यांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर नेहमी त्यांच्या भूमिका बदलत गेल्या आहे. 1995 काळात सुद्धा ते भाजप शिवसेनेसोबत होते. आधी ते काँग्रेसबरोबर होते. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्या भूमिका सातत्याने बदलत राहिल्या आहे. ज्याचं सरकार येईल त्यांच्या बाजूने जायचं आणि सत्तेचा उपभोग घ्यायचा, असे धोरण विखेंचा आजपर्यंत राहिलं असल्याचा टोला तुपकर यांनी लगावला.
त्यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांना काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. थोरात हे काँग्रेस पक्षासोबत सुरवातीपासून एकनिष्ठ आहे. पडत्या काळात सुद्धा ते पक्षासोबत होते, आणि त्या काळात पक्षाला उभारणी देण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. त्यामुळे थोरात यांच्याबद्दल विखेंनी केलेल्या टीका गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सुद्धा तुपकर म्हणाले.