वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:12 PM2024-06-17T22:12:35+5:302024-06-17T22:13:08+5:30
रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.
देशात सध्या मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाने धुमाकूळ उडवून दिला आहे. यामतदारसंघात लोकसभा निवडणूक निकालाचा धुरळा काही केल्या खाली बसण्याचे नाव घेत नाहीय. शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी केवळ ४८ मतांनी विजयाची नोंद केली. त्यापूर्वीच मतमोजणीवेळी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आले होते. या सगळ्याचा परिणाम पंधरा दिवस होत आले तरी कायम आहे.
रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. या वादातून आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतमोजणीच्या दिवशी पोतनिस यांनी सशस्त्र पोलीस अंगरक्षकासह विनापरवानगी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. ठाकरे गट वेगवेगळे आक्षेप घेत असल्याने आता वायकरांनीही यावर आक्षेप घेतला असून त्यांच्या तक्रारीवरून वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र मिळालेल्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश होता. परंतू पोतनिस यांच्याकडे तसे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यांनी सायंकाळी ४ ते रात्री ८ असा प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत अमोल किर्तीकर देखील होते, अशी तक्रार वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वायकरांच्या मेहुण्यावर आणि मुलीवर आक्षेप घेतलेले उमेदवार शाह यांनी हे प्रकरण उकरून काढले होते. त्यांनी तक्रारी केल्या होत्या परंतू त्याची दखल घेण्यात आली नव्हती. आता तहसीलदारांनी तक्रार दिली आहे. यात मेहुण्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप शाह यांनी रविवारी केला होता. वायकरांची मुलगी प्रज्ञा देखील मोबाईल वापरत होती, आम्ही तक्रार देऊनही, जबाब नोंदवूनही तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला आहे. याचबरोबर तक्रार आम्ही केली होती ती न नोंदविता तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला? या गुन्ह्यात वायकर यांच्या मुलीचे नाव कसे काय वगळण्यात आले? पोलीस कोणाच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत असे सवालही शाह यांनी केले आहेत.