रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:42 AM2024-05-11T09:42:34+5:302024-05-11T09:42:52+5:30

आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार वायकर यांच्याविरोधात उद्धवसेनेतर्फे अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

Ravindra Vaikar's problem will increase? Notice of disqualification from Uddhav thackeray Shiv sena | रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क  
मुंबई : उद्धव ठाकरेंची साथ सोडत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार वायकर यांच्याविरोधात उद्धवसेनेतर्फे अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना उद्धवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फूट मान्य केली आहे, तसेच विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतही शिवसेनेत दोन सेना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निकाल दिला, तेव्हा वायकर आमच्या पक्षात होते. आजही ते उद्धवसेनेचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार ते अपात्र ठरतात. त्यामुळे आम्ही वायकरांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी मला न्याय दिला’
माझ्यावरचे सर्व आरोप खोटे असताना मला ईडीची नोटीस आली. मधल्या काळात मी ईडीच्या चौकशीलाही सामोरा गेलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत. एक तर जेलमध्ये जा किंवा पक्ष सोडा, हे दोनच पर्याय होते. तणावात असताना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजून घेत मला पाठिंबा आणि न्याय दिला. 
- रवींद्र वायकर

आपल्याला चुकीच्या प्रकरणात कसे गोवले गेले. दबाव असल्याने जेल किंवा पक्ष बदल हेच पर्याय होते आणि पत्नीलाही गोवल्यामुळे पर्याय नव्हता असे रवींद्र वायकर यांनी सांगितले आहे. वायकर यांच्यावर ही वेळ महाशक्तीच्या नीतीने आणली आहे. शिंदे गटाचे खा. गजानन किर्तीकर यांनीही ईडीचा गैरवापर थांबवा असे सांगितले. वायकरांनी स्वतः उघड केलेला हा प्रकार मुंबईकरांनी सहन करु नयेत. 
- सचिन सावंत, 
सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस
 

Web Title: Ravindra Vaikar's problem will increase? Notice of disqualification from Uddhav thackeray Shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.