महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 01:42 PM2019-11-13T13:42:57+5:302019-11-13T20:30:52+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते.
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी द रिट्रीट हॉटेलमध्ये जाऊन सर्व आमदारांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या संपर्कात असल्याचं विधान केलं होते. मात्र शिवसेनेचे आमदार विचलित होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे भाजप संपर्कात असल्याचे सांगत असल्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिकिया देताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना सत्तास्थापना करतील असा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून ही दोन्ही पक्ष दुरावली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन शिवसेना सत्तास्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेना इतर पक्षाचे पाठिंब्याचे पत्र सादर करू न शकल्याने सत्तास्थापनेचा दावा सेनेला करता आला नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात होते.
मात्र मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी द रिट्रीट हॉटेलमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. राष्ट्रपती राजवटीनं घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. आपण लवकरच सत्ता स्तापन करणार आहोत, असं सांगतानाच भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. मात्र दानवे यांनी उद्धव यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
भाजप शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे उद्धव कोणत्या आधारे बोलले हे मला सांगता येणार नाही. तसेच याबाबतीत मला काही महिती मिळाली नसल्याचे दानवे म्हणाले. मात्र शिवसेनेचे आमदार विचलित होऊ नयेत, तसेच त्यांचा उत्साहा वाढवा म्हणून भाजपकडून संपर्क साधला जात असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरेंकडून केले जात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रतिकिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.