रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात चोरांची 'चैन'
By Admin | Published: March 4, 2017 04:08 PM2017-03-04T16:08:11+5:302017-03-04T16:08:11+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र तसेच भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 4 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र तसेच भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. या शाही विवाहसोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांचे मोबाईल, सोनसाखळी आणि पाकिटं चोरट्यांनी लांबवली आहेत. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
जबिंदा लॉन्स येथे संतोष दानवे यांचा रेणू सरकटे यांच्यासोबत 2 मार्च रोजी विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाहासाठी केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांसह, विविध राजकीय पक्षाचे नेते, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या गर्दीत चोरट्यांनी आपले हात धुवून घेतले. नक्षत्रवाडी परिसरातील हिंदुस्थान आवास येथील शुभम घनश्याम गायकवाड हा तरुण संतोष दानवेंच्या लग्नासाठी उपस्थित होता. यावेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 9 ग्रॅमची सोनसाखळी तोडून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.
उत्तरानगरी येथील प्रमोद खानझोडे हे सुद्धा या लग्नाला उपस्थित होते. यावेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 15 हजाराचा मोबाईल चोरून नेला. तिसरी घटना नारायण बापुराव आष्टेकर (रा. मुकुंदवाडी)यांच्या बाबतीत घडली ती म्हणजे चोरट्यांनी त्यांचा सात हजाराचा मोबाइल लांबवला. तर न्यू एस.टी. कॉलनीतील रहिवासी कल्याणी खेडेकर यांचा 10 हजारांचा मोबाइल चोरट्यांनी चोरला. विजयंतनगर येथील अनिल पालांदुरकर यांचाही मोबाइल चोरीला गेला.