अप्रमाणित औषधांसाठी चीनकडून कच्चा माल; राज्याबाहेर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 05:37 PM2018-09-15T17:37:39+5:302018-09-15T17:38:26+5:30

Raw material from China for uncertified drugs; Out of state production | अप्रमाणित औषधांसाठी चीनकडून कच्चा माल; राज्याबाहेर उत्पादन

अप्रमाणित औषधांसाठी चीनकडून कच्चा माल; राज्याबाहेर उत्पादन

Next

- वैभव बाबरेकर


अमरावती : अन्न व औषध प्रशासनाकडून तपासण्यात आलेल्या औषध नमुन्यांपैकी अप्रमाणित आढळलेल्या नऊ औषधांचे उत्पादन राज्याबाहेरचे आहे. यापैकी काही कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले असून, ते प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहेत. 


 एफडीए अमरावतीमार्फत जिल्ह्यातील विविध औषध विक्रेत्यांजवळील नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात राज्याबाहेरील कंपन्यांनी उत्पादित केलेल्या नऊ औषध अप्रमाणित आढळले. त्यामध्ये अँटिबायोटिक टॅबलेटचा सर्वाधिक सहभाग आहे. या औषधांचा साठा बाजारपेठेतून परत बोलाविण्यात आला होता. अप्रमाणित आढळलेल्या नऊ औषध कंपन्यापैकी सहा कंपन्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी एफडीएने राज्य प्रशासनाला कळविले आहे, तर तीन प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्याविरुद्ध एफडीएने न्यायालयीन खटले दाखल केले. औषधामधील गुणधर्म (कन्टेन्ट) व ठरवून दिलेले घटक कमी आढळून आल्याने त्या अप्रमाणित ठरल्या आहेत.

 
अप्रमाणित ठरविताना ए, बी, सी, डी अशा चार वर्गवारीत औषधींची तपासणी केली जाते. त्यातील ए व बी कॅटेगिरी असलेल्या नऊ औषधी अप्रमाणित ठरल्या आहेत. ५०० एमजीच्या गोळ्यांमध्ये १०० एमजीचे कन्टेन्ट आढळून आल्याने औषधी अप्रमाणितचा दर्जा दिला गेला. या औषधी रुग्णांवर परिणामकारक नसून, रुग्ण बरा होत नाही. अशाप्रकारे औषध उत्पादित करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

चीनमधून कच्चा माल
औषध उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल दर्जेदार आहे किंवा नाही, यावरून त्याची किंमत ठरविली जाते. काही कंपन्या चीनमधून कच्चा माल आणत असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली. टॅबलेटमध्ये कोटेड व अनकोडेट असे दोन प्रकार आहेत. मानवी शरीरात गोळी गेल्यानंतर ती पंधरा मिनिटांतच विरघळणे आवश्यक असते. मात्र, काही गोळ्या विरघळण्यास वेळ लागतो. अशाही औषधी अप्रमाणित ठरविल्या गेल्या आहेत. 

या आहेत अप्रमाणित औषधी
बॅच नंबर १७०१ ची बीटॉफ-प्लॅस टॅब (उत्पादक - अ‍ॅसॉसीया बायोटेक, पंतनगर, उत्तराखंड), बॅच नंबर ईटी-१७३१५ ची अ‍ॅफसीड-४० टॅब (इव्हेंट्स कॉरपोरेशन्स, सिरमौर, हिमाचल प्रदेश), बॅच नंबर यूबीटी ७१३५ ई ची रेलमॉक्स-सीव्ही ६५० टॅब (अल्ट्रा ड्रग्ज प्रा.लि., सोलन, हिमाचल प्रदेश), बॅच नंबर झेडटी २४४ ची रॅबीमेट-२० टॅब ( श्री रमेश्ठ इंड्रस्टिज, सोलन, हिमाचल प्रदेश), बॅच नंबर ४५१ चे अ‍ॅब्जॉर्व्हंट गेज शेड्यूल एफ (२) (अरुण प्रॉडक्ट्स, छत्रपती, तामिळनाडू), बॅच नंबर बी/१७११०५ चे सेफो-३ २०० एमजी टॅब (एसबीएस बायोटेक, सिरमौर, हिमालचल प्रदेश), बॅच नंबर १७०१६३ चे न्यूट्रॅसिड संस्पेंशन (शुगर फ्री औषध) (वेगा बायोटेक, वडोदरा, गुजराज), बॅच नंबर टीएसपी ७२६६ चे सिम्फ्लॉक्स-२०० टॅब (सिम्बॉयसीस फार्मास्यूटिकल्स, सिरमौर, हिमाचल प्रदेश), बॅच नंबर २७० चे अ‍ॅब्जॉर्व्हंट गेज शेड्युल एफ (२) (झेनिथ कॉर्पोरेशन, मिरत, उत्तरप्रदेश) या औषधी अप्रमाणित आढळल्या आहे.  

अप्रमाणित आढळलेल्या औषधांच्या काही कंपन्यांंवर प्रशासकीय कारवाईसाठी राज्य प्रशासनाकडे पत्र दिले आहे, तर काही कंपन्यांविरुद्ध खटले दाखल केले आहेत. 
एस.जी. डांगे, औषधी निरीक्षक, एफडीए.

Web Title: Raw material from China for uncertified drugs; Out of state production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.