'वंदे मातरम्' म्हणायला रझा अकादमीचा विरोध; सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 04:00 PM2022-08-15T16:00:14+5:302022-08-15T16:00:39+5:30

सरकारने वंदे मातरम् या शब्दाच्या बदल्यात दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा जो सगळ्यांना मान्य असेल असं रझा अकादमीनं सांगितले आहे.

Raza Academy's opposition to chanting slogans 'Vande Mataram'; Controversy over the order of Sudhir Mungantiwar | 'वंदे मातरम्' म्हणायला रझा अकादमीचा विरोध; सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरून वाद

'वंदे मातरम्' म्हणायला रझा अकादमीचा विरोध; सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरून वाद

Next

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यापुढे अधिकारी, कर्मचारी यांनी फोनवर हॅलो बोलण्याऐवजी वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करावी असा आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेत. मात्र या आदेशावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या या आदेशाला रझा अकादमीनं विरोध दर्शवला असून वंदे मातरम् म्हणणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयाला रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी विरोध करत आमच्यात फक्त अल्लाहाची पूजा होते. सरकारने वंदे मातरम् या शब्दाच्या बदल्यात दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा जो सगळ्यांना मान्य असेल. सरकारच्या या आदेशाविरोधात उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला पत्र लिहू असं रझा अकादमीने म्हटलं आहे. 

काय आहे वाद?
१८०० साली टेलिफोन अस्‍तित्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्‍कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल असेही मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

वंदे मातरम् हे आपले  राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द   उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत असं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Raza Academy's opposition to chanting slogans 'Vande Mataram'; Controversy over the order of Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.