Bank Holiday Today: राज्यात आज सार्वजनिक सुट्टी, पण बँका सुरु असणार का? RBI काय म्हणाली पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:03 AM2022-02-07T00:03:34+5:302022-02-07T00:07:49+5:30
Bank Holiday Today in Maharashtra: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे आज राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
एसबीआय, बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी आणि खासगी बँका या केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या अखत्यारित येतात. यामुळे राज्याने घेतलेले निर्णय त्यांच्यावर लागू होत नाहीत. केंद्र सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला असला तरी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली नाही. असे असले तरी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली राज्य सरकारने घेतलेले निर्णय राष्ट्रीय बँकांनाही त्या राज्यापुरते लागू होतात. यामुळे आज ७ फेब्रुवारी बँका सुरु राहतील की बंद असतील याबाबत लोक प्रश्न विचारत होते. यावर आरबीआयने उत्तर देत लोकांमधील संभ्रम दूर केला आहे.
याच कारणाने आरबीआयने मुंबईत होणारी मॉनिटरी मिटींगची तारीख एक दिवसाने पुढे ढकलली. आज होणारी ही तीन दिवसीय बैठक उद्या म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. याला आरबीआयने लतादीदींच्या दुखवट्याचे कारण दिले आहे. तसेच महाराष्ट्र वगळता देशभरातील बँका आज सुरुच राहणार आहे. फक्त महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच जे कोणतेही व्यवहार पेंडिंग असतील ते ८ फेब्रुवारीला केले जातील, असेही आरबीआयने म्हटले आहे.
Settlement of all outstanding transactions will accordingly get postponed to the next working day i.e., February 8, RBI added in a statement.
— ANI (@ANI) February 6, 2022
महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केल्यामुळे, सरकारी सिक्युरिटीज (प्राथमिक आणि दुय्यम), परकीय चलन, मुद्रा बाजार आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत असे आरबीआयने म्हटले आहे. सर्व थकित व्यवहारांचे सेटलमेंट त्यानुसार पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत म्हणजे 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल, असे RBI ने एका निवेदनात नमूद केले आहे.