पीएमसीच्या खातेदारांना मोठा दिलासा; अटींवर आणखी 50 हजार काढता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 09:40 AM2019-10-23T09:40:03+5:302019-10-23T09:51:47+5:30
पीएमसी बँकेतून पहिल्यांदा हा महिन्यांत केवळ 10 हजारच काढता येणार होते. मात्र, आरबीआयने विरोध पाहून ही रक्कम 40 हजारावर केली आहे.
मुंबई : आरबीआयने निर्बंध आणलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांना गरजेवेळी पैसे काढता न आल्याने आत्महत्या, हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुलुंड येथे राहणाऱ्या एका वृद्धाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावर रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे.
पीएमसी बँकेतून पहिल्यांदा हा महिन्यांत केवळ 10 हजारच काढता येणार होते. मात्र, आरबीआयने विरोध पाहून ही रक्कम 40 हजारावर केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत 4 खातेदारांचा मृत्यू झाला आहे. मुलुंड येथे राहणारे मुरलीधर धर्रा यांना उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत.
काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकून राहिल्याचा मानसिक तणावातून ह्रदयविकाराच्या झटक्यानं संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असताना तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केली होती.
#PMCBank now ₹50,000 withdrawal (in addition to ₹40,000) allowed for medical/education urgency. needy person has to apply to their branch
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 23, 2019
पी एम् सी बैंक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजेंसी साठी अधिक ₹५०,००० त्यांचा खात्यात्तुन काढू शकणार @BJP4Maharashtra
यामुळे आरबीआयने काल बँकेच्या पाच खातेदारांना चर्चेसाठी भेटण्याची संधी दिली होती. आज आरबीआयने 40 हजारांव्यतिरिक्त आणखी 50 हजार रुपये काढण्याची मुभा दिल्याचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी सांगितले. मात्र, हे अधिकचे पैसे काही अटींवर मिळणार आहेत. वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढू शकणार आहेत. यासाठी बँकेमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे दिल्यास हे पैसे मिळू शकणार आहेत.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेमधून रक्कम काढण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने घातलेले निर्बंध रद्द करावेत व आरबीआय, डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला पीएमसीच्या ठेवीदारांसाठी निधी उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.