शेतकऱ्यांसाठी आरबीआयची खुशखबर...विनातारण कर्ज मर्यादा 60 हजारांनी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:28 PM2019-02-07T17:28:54+5:302019-02-07T17:51:00+5:30
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती.
मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी दिली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावे लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली. याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.