पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:57 PM2019-11-04T13:57:57+5:302019-11-04T13:58:09+5:30
आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांना सोबत येऊनच सरकार स्थापन करावे लागलणार आहे. मात्र सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले चर्चा फोल ठरत आहे. तर विरोधकांनी ठेवलेल्या अटी मान्य न झाल्यास राज्यात पुन्हा निवडणुकीचा धडका उडू शकतो. या संदर्भात मंत्र्यानेच संकेत दिले आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.
पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तयारीला लागण्याचे आदेश भाजपमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांमध्ये केवळ 2 किंवा 5 हजार मतांचा फरक आहे. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास, मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, अशी भिती विजयी आमदारांमध्ये आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत.
आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे.
दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. त्यात भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेसकडून देखील पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना तयार न झाल्यास, राज्यात मध्यवधी निवडणूक होऊ शकते. परंतु, आर्थिक स्थिती आणि निवडणुकीचा भार यामुळे विद्यमान आमदारांचे 'इंडिकेटर' लागले आहेत.