वयोमर्यादा ओलांडलेल्यांना नोकरभरतीत पुन्हा एक संधी; मुख्यमंत्र्यांकडून दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 09:42 AM2021-12-18T09:42:19+5:302021-12-18T09:42:36+5:30
अखेर शासन आदेश निघाला
मुंबई : शासनाच्या सरळ सेवा भरतीत १ मार्च २०२० ते आजतागायत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी काढण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने या कालावधीत काही उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली होती. अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी विशेष बाब म्हणून शेवटची एक संधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने १० नोव्हेंबर रोजी घेतला होता. त्या अनुषंगाने आजचा आदेश काढण्यात आला आहे. एमपीएससी परीक्षेपासून हजारो उमेदवार वंचित राहात असल्याने विशेष बाब म्हणून शेवटची आणखी एक संधी देण्याची मागणी होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानेही अनेकांना फटका बसला होता.
ज्या जागांसाठी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून, जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आजच्या आदेशानंतरच्या दिनांकाचा असेल, अशा प्रकरणीदेखील १ मार्च २०२० ते आजतागायत कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांनाही परीक्षेस बसण्याची संधी दिली जाईल.
वयोमर्यादेचा अडथळा आता नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात नमूद अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आजच्या शासन आदेशापूर्वी उलटून गेलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणीदेखील १ मार्च २०२० ते आजतागायत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही एक संधी दिली आहे.