अंतर्गत परीक्षांचेही ‘पुनर्मूल्यांकन’
By admin | Published: June 29, 2016 02:00 AM2016-06-29T02:00:06+5:302016-06-29T02:00:06+5:30
पुनर्मूल्यांकनासोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची फोटोकॉपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
मुंबई : अंतर्गत परीक्षांच्या गुणांचेही पुनर्मूल्यांकन होणार असून, पुनर्मूल्यांकनासोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची फोटोकॉपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७पासून हा निर्णय अंमलात आणणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
बाह्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीची सुविधा उपलब्ध आहे. तशी सुविधा अंतर्गत परीक्षांसाठी नव्हती. अनेकदा प्रकल्प सादर करूनही गुण देत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांमध्येही पारदर्शकता यावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. १६ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी मार्च-एप्रिल २०१६च्या सहाव्या सत्रासाठी प्रकल्प सादर केले आहेत, त्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे; शिवाय शैक्षणिक २०१६-१७ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षांच्या सर्व विषयांच्या गुणांचे पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे कुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
>तेरावी प्रवेशासाठी आॅनलाइन संधी
तेरावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी २ ते १५ जुलै या कालावधीत सुरू राहणार आहे. तेरावी प्रवेशासाठी विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. १४ ते २५ जून या कालावधीत ही नोंदणी करणे अनिवार्य होते. पण अजूनही विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली नसेल, तर ती करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर ज्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक आहेत, त्या भरण्यासाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी २ ते १५ जुलै या कालावधीत प्री इन्रोलमेंट लिंक सुरू ठेवण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांनी स्पष्ट केले.