गूढ मृत्यूला फुटली वाचा
By admin | Published: February 13, 2016 11:47 PM2016-02-13T23:47:53+5:302016-02-13T23:47:53+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक तरुण व्याख्याती विजया देशमुख हिच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता औपचारिक गुन्हा नोंदवून येत्या सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कॉलेजच्या कर्मचारी निवासस्थानांत विजयाच्या भाजून झालेल्या रहस्यमय मृत्यूला आता २५ वर्षांनी पुन्हा वाचा फुटणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी एज्युकेशन सोसायटीतर्फे हे कॉलेज चालविले जाते.
संगमनेर येथील एक नागरिक हेमंत यशवंत ढगे यांनी केलेले अपील मंजूर करून न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. इतकी वर्षे रेंगाळलेल्या या प्रकरणात पोलीस आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी याआधी केलेल्या चुका आता सुधाराव्यात. ढगे यांनी केलेल्या फौजदारी फिर्यादीवर पोलिसांनी आता गुन्हा नोंदवून सहा महिन्यांत तपास पूर्ण करावा व या तपासाचा अहवाल दंडाधिकाऱ्यांना सादर करावा; तसेच पोलिसांचा तपासी अहवाल आल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी, याआधी वरिष्ठ न्यायालयांनी नोंदविलेल्या कोणत्याही मताने प्रभावित न होता, त्यावर कायद्यानुसार निर्णय करावा, असा आदेश खंडपीठाने दिला.
ढगे यांच्या या फिर्यादीत संगमनेर येथील डॉ. सुधीर तांबे व इतरांना आरोपी करण्यात आले होते. दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना तपासाचा आदेश दिला होता. परंतु इतक्या वर्षांत औपचारिक गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. असे असले तरी आता गुन्हा नोंदवून तपास लवकरात लवकर पूर्ण केला जावा, यावर ढगे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, डॉ. तांबे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम आणि राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील या तिघांमध्येही एकमत झाले. ते लक्षात घेऊन खंडपीठाने वरील आदेश देताना असे नमूद केले की, गुन्हा नोंदला नव्हता म्हणून त्यामुळे आत्तापर्यंत केल्या गेलेल्या तपासाला कोणतीही बाधा येणार नाही.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही दुसरी वेळ होती. ढगे यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन तो एस.एस. काळबांडे या उप अधीक्षक दर्जाच्या विशेष पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध डॉ. तांबे यांनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. (विशेष प्रतिनिधी)
नेमके काय घडले होते?
विजया देशमुख आणि त्यांचे बंधू प्रतापराव देशमुख हे दोघेही अमृतवाहिनी कॉलेजात व्याख्याते होते व ते व्यवस्थापनाने दिलेल्या निवासस्थानात एकत्र राहात असत. २५ जानेवारी १९९१ रोजी या घरात विजया ८५ टक्के भाजली.
सुरुवातीस तिला संगमनेर येथील डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांच्या इस्पितळात व नंतर पुण्यात कसबा पेठेतील सूर्या इस्पितळात हलविले गेले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारांनंतर
१६ फेब्रुवारी १९९१ रोजी तिचे निधन झाले. संगमनेर पोलिसांनी त्या वेळी अपघाती मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंद केले होते.
यानंतर तीन वर्षांनी जुलै ९४मध्ये दशरथ हासे व त्यानंतर १२ वर्षांनी आॅक्टोबर २००६मध्ये विजय ठाकूर यांनी या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी फिर्यादी दाखल केल्या होत्या. मात्र नंतर त्या मागे घेण्यात आल्या. त्यानंतर हेमंत ढगे यांनी तिसरी फिर्याद दाखल केली व तिचे कवित्व अद्याप सुरू आहे.